परवा तांबट आळीतून चाललो होतो .....पाण्याचा बंब पाहिला आणि जुन्या आठवणीना उजाळा मिळाला ...आमच्या गावाकडे खटल्याचे कुटुंब ...चार -पाच काका ...त्यांची वीस -पंचवीस मुले ..म्हणजे माझी चुलत भांवंडे..गावाकडे जत्रेला गेलो न मग पहाटेच्या बोचर्या थंडीत हुडहुडी अंगात असताना माजघरात पोरे कुडकुडत बसलेली असायची ...तांब्याचा पाण्याचा बंब धुमसून पेटलेला असायचा ..बाजूला लाकडांचा ढीग ,रॉकेलची बाटली .,कोयता ..,गवर्या ...शिंप्याच्या पोत्यातल्या चिंध्या ...असे वातावरण ...धुके ...त्यात धूर ..त्यात ओल्या लाकडाच वास ...संपूर्ण घरात धूर...अर्धवट झोपेत डोळ्यात जाणारा धूर ......बम्बातून निघणार्या ज्वाला ....मधेच आग विझली कि आजीचे ओरडणे ..सुनांना फैलावर घेणे कार्यक्रम सुरु व्हायचा ...कामाची वाटणी सुरु व्हायची ....पाण्याचा बंब ...त्याच्या खाली असणारी मुठ असलेली लोखंडी झारी ..तिच्यात विस्तू पडण्यास सुरवात झाली कि ...त्यातला विस्तू घेऊन चूल पेटवल्या जायची .....बंबाला एका बाजूला वरती पितल्याचे झाकण असायचे ..त्याला बिजागरी असायची ...बंबाला पितळी नळ असायचा ....पाणी काढले कि परत त्यात मोठ्या पितळी घागरीने पाणी ओतणे चालू असायचे ...त्यातले थोडेसे पाणी आगीवर पडायचे ...मग परत धूर ....परत आजीचे किंवा मोठ्या काकूचे ओरडणे ......चुलीतील एका बाजूला चहाचे पाणी उकळत असायचे .....त्या चहाचा आणि त्या लाकडाच्या धुराचा वास एक व्हायचा ......
एकेकाच्या अंघोळी संपत येत आल्या कि ...मग कान नसलेल्या कपातून चहा पिणे ...पितळी परातीत चहा पिणे कार्यक्रम चालू असायचा ....आमच्या गावात काहींकडे पितळ्याचा बंब असायचा ...ते घर श्रीमंताचे असायचे .......आता पाण्याचा बंब दिसला कि गावाकडची आठवण येते .....जाडा पितळी नळ असलेला पाण्याचा बंब काही दिवसांनी संग्रहात पाहिला मिळेल .....
बम्बातील पाण्याला ओल्या लाकडाचा ..थोडास रॉकेलचा वास लागलेला असायचा ...ते पाणी अंगावर घेत ...काही स्तोत्रे जोरात ओरडून आंघोळ करणारे माझे वडील मला कधी -कधी म्हणतात ......आता मिळतो कारे कुठे पाण्याचा बंब ?
मी मनात म्हणतो ...बंब मिळेल .....पण लाकडे गोळा करून आणणारे ...गवर्या थापाणारे ...लाईनीत थांबून रॉकेल आणणारे .....कोयत्याने बरोबर लाकडे तोडणारे ...आणि मुख्य म्हणजे बंब पेटवायची कला असलेले हात आता राहिलेले नाहीत ...........आणि अंघोळ झाल्यावर लगेचच स्वयंपाकाला लागणाऱ्या आणि चुलीपुढे धुराने आणि सासूच्या ..मोठ्या दिराच्या शेलक्या शिवीगाळाने डोळ्यात कढत येणाऱ्या पाण्याला साडीच्या काठाला पुसणाऱ्या आया-बाया आता राहिल्या नाहीत .................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा